अन्यथा राज्यात पुन्हा निर्बंध लावावे लागतील …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- कोरोना संसर्गाचा धोका कायम असताना व केंद्राकडून आगामी सणांच्या काळात निर्बंध लावण्याबाबत सूचना करण्यात आल्या असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज यावर महत्त्वाचे विधान केले आहे.

नियमांबाबत अजित पवार यांनी अगदी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. ‘केरळ राज्यात निर्बंध कमी केल्याने तेथे मोठ्या प्रमाणात नागरीक बाहेर पडले. अलीकडेच एक सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. त्यामुळे तेथे बाधितांची संख्या वाढली असून परत निर्बंध लावण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्रात गोपाळकाला, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी असे मोठे सण आता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सण साजरे करताना काळजी घ्यावी. अन्यथा पुन्हा निर्बंध लावावे लागतील’, असा इशारा अजित पवार यांनी दिला. करोनाचे सावट अद्याप कायम असल्याने नागरिकांनी दहीहंडी ते दिवाळी या सर्व सणांमध्ये करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे,

असे आवाहनही अजित पवार यांनी केले. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दोनच दिवसांपूर्वी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहून सावध केले आहे. कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून जे प्रयत्न सुरू आहेत ते कौतुकास्पद आहेत.

दैनंदिन नवीन करोना बाधितांच्या संख्येत गेल्या महिनाभरापासून राज्यात घट पाहायला मिळत आहे मात्र, काही जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढत असल्याने अधिक खबरदारी घ्यावी लागेल. येत्या काळात दहीहंडी आणि गणेशोत्सव यासारखे मोठे सण आहेत. या सणांच्या काळात गर्दी होण्याची शक्यता आहे.

कोविडचा धोका पाहता ही गर्दी टाळणे गरजेचे आहे. त्यासाठी निर्बंध लावण्याचा विचार राज्य सरकारने करावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य सचिवांनी या पत्रात केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24