… अन्यथा पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही? भाजपचे जिल्हाध्यक्ष मुंडे यांचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले असून, याप्रकरणी जोपर्यंत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना क्लीनचिट मिळत नाही.

तोपर्यंत त्यांचे मंत्रीपद आणि अहमदनगरचे पालकमंत्री पद काढून घेण्यात यावे. अन्यथा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांना नगर जिल्ह्यात फिरून देणार नाहीत. असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी दिला आहे. मुंडे म्हणाले- राज्यातील ठाकरे सरकार हे तर पळ काढण्यासाठी बळ वापरणारे सरकार आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ.किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडेल. या भीतीपोटी सोमय्या यांनाच चार भिंतीआड दडवून संकटापासून वाचविण्याची ठाकरे सरकारची युक्ती म्हणजे पळपुटेपणाची परंपरा पुढे चालू ठेवण्याचाच प्रकार आहे.

अशा भ्याडपणामुळे राज्यातील भ्रष्टाचारास पाठबळ मिळत आहे. असा आरोप त्यांनी या पत्रकात केला. भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालून तो उघडकीस आणणाऱ्यांवरच कारवाई करण्याच्या या धोरणामुळेच ठाकरे सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले असून, केवळ दडपशाही करून अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न आता सुरू आहे.

कोरोनाच्या संकटास तोंड देण्याऐवजी ठाकरे सरकारने जनतेस घरात बसावयास भाग पाडले. शाळांना कुलुपे लावून विद्यार्थ्यांना घरात बंद केले, त्यामुळे शिक्षणाचा बोजवारा उडाला. आता कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढण्यासाठी नाकर्ते ठाकरे सरकार सरसावले आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे उघडी पडली आहेत, आणि सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आरोप होत आहेत.

यामुळे अस्वस्थ असलेले पक्षाचे कार्यकर्ते सरकारी पाठबळावर पोलिसांदेखत हाणामाऱ्या करीत असून, कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडवत असताना पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. असा गंभीर आरोप त्यांनी पत्रकात केला आहे.