अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-शिवजयंतीच्या अटी सरकारने शिथिल न केल्यास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरच शिवजयंती साजरी करण्यात येईल, असा इशारा शेतकरी मराठा महासंघाचे राज्याध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी दिला.
यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे. दि.१९फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव जागतिक पातळी साजरा केला जातो.
करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवजयंती साधेपणाने साजरी करावी, असे बंधन टाकल्यामुळे महाराष्ट्रात शिवभक्तांमध्ये नाराजी पसरली असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सरकारने घातलेली ही अट तातडीने शिथिल करावी, अन्यथा महाराष्ट्रातील तमात शिवभक्तांसह मराठा महासंघ दि.१९ फेब्रुवारीला मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी शिवजयंती साजरी करणार आहे.
आज राज्यात वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे मेळावे तसेच शेतकरी आंदोलने होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकाही पार पडल्या आहेत, यासाठी कोणतीही बंधने नव्हती.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शासकीय परिपत्रकातील अटी रद्द कराव्यात, असे दहातोंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.