अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झालेली अटक आणि जामीनावर सुटका, या घडामोडीनंतर राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज पुन्हा सुरु झालीय.
यावेळी राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त उमेदावर निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार, भविष्यात महाराष्ट्रात आमच सरकार येणार असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
नारायण राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रा आजपासुन रत्नागिरीत सुरु झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलेलो नाही. आम्हीही सत्तेत येऊ, असं सांगतानाच आम्ही केंद्रात सत्तेत आहोत, असा गर्भित इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.
राणेंच्या पाठी लागू नका. नाही तर मी आता थोडंच बोलतोय, सर्वच बोलावं लागेल. ते परवडणार नाही. मी क्रिमिनिल होतो तर मुख्यमंत्री कसं केलं? मंत्री, आमदार, नगरसेवक शाखाप्रमुख कसं केलं? तेव्हा विरोध का केला नाही? असा सवाल नारायण राणे यांनी विचारला आहे.
दरम्यान १७ सप्टेंबरला पुढील सुनावणी होईपर्यंत राणे यांनी वादग्रस्त वक्तव्ये करू नयेत असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यामुळे राणे पुढील यात्रेदरम्यान काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नारायण राणे यांनी शिवसेनेविरोधात वक्तव्ये केल्यास कोकणात त्यांची जन आशीर्वाद यात्रा होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष तीव्र होणार का अशीही चर्चा आहे.