अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- अवकाळी पावसावर मात करत जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत ऊस, कांदा यांच्यासह 4 लाख 8 हजार हेक्टरवर रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या झालेल्या आहेत.
यात कांदा पिकाची लागवड ही विक्रमी 92 हजार हेक्टरपर्यंत पोहचली आहे. यंदा परतीच्या पावसाच्या दणक्यामुळे रब्बी ज्वारीच्या पेरण्यावर मोठा परिणाम झालेला आहे.
मात्र, ज्वारी पेरणीचा 15 ऑक्टोबरचा कालवधी संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी झालेली आहे. ज्वारीचे क्षेत्र 1 लाख 46 हजार हेक्टरपर्यंत पाहचले आहे.
दुसरीकडे गव्हाच्या पेरणीचे क्षेत्र वाढत असून आतापर्यंत सरासरीच्या 28 हजार 918 हेक्टरवर गव्हाची पेरणी झालेली आहे. यासह हरभरा पिकाची पेरणी 38 हजार हेक्टरपर्यंत पोहचली असून पेरणी टक्केवारी ही 25 टक्के झाली आहे.
जिल्ह्यात उस आणि कांदा पिकाशिवाय 2 लाख 22 हजार हेक्टरवर 31 टक्के पेरण्या झालेल्या आहेत. मागील आठ दिवस हे अवकाळी पावसामुळे वाया गेले आहेत.
त्यात काही ठिकाणी दमदार पाऊस झाल्याने पेरण्यासाठी शेतकर्यांना वापसा होण्यासाठी वाट पाहवी लागणार आहे. तर काही ठिकाणी गहू, कांदा आणि हरभर पिकांवर या अवकाळी पावसामुळे रोगाचा प्रार्दभाव होण्याची शक्यता आहे.