‘जिल्ह्यात उपलब्ध ऑक्सिजनचे होणार समन्यायी केंद्रीय पध्दतीने वाटप’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-जिल्हयातील कोरोना संक्रमणाच्या वाढत्या परिस्थितीत उपचारासाठी उपयोगात येणाऱ्या ऑक्सिजनचा पर्याप्त वापर होण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पथदर्शी निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार जिल्ह्यातील शासकिय व खाजगी रुग्णालयांना समन्यायी व केंद्रीभुत पध्दतीने ऑक्सिजन दैनंदिन प्रमाणासह वितरीत केला जाणार आहे. यासाठीच्या नियोजनाकरीता अधिकारी, कर्मचारी तैनात केले आहेत.

जिल्हयात असलेल्या पाच ऑक्सिजन रिफिलरनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऑक्सिजनच्या धोरणात सुसुत्रतेसाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांनी सांगितले.

जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या तसेच ऑक्सिजन बेडवर असलेल्या रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे प्राप्त ऑक्सिजनचा पर्याप्त वापर करणे आवश्यक झाले आहे.

ऑक्सिजनच्या सुरळीत पुरवठ्याअभावी जिल्ह्यातील शासकिय व खाजगी रुग्णालयाततील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकात भितीचे वातावरण निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेबाबत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच खाजगी रुग्णालयांचे चालक ऑक्सिजन रिफिलर प्लँटचे ठिकाणी जावून ऑक्सिजनची मागणी करतात. ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने रिफिलर प्लॉटचे ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेस बाधक स्थिती निर्माण होते.

हि सर्व परिस्थिती विचारात घेता ऑक्सिजन रूग्णालयातील ऑक्सिजन बेड व मागणी विचारात घेता त्या प्रमाणात रूग्णालयांना समन्यायी,

केंद्रीभूत पध्दतीने ऑक्सिजन वाटप करणे आवश्यक मानून साथरोग अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार प्राप्त अधिकाराचा वापर करीत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी रविवारी आदेश जारी केले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांनी दिली.

जिल्ह्यात नगर मनपा हद्दीसह ग्रामीण भागात कोरोना उपचारासाठी ऑक्सिजन बेडसह कार्यान्वित असलेल्या २०३ रुग्णालयांची सूची तयार करण्यात आली आहे.

आता ऑक्सिजन बेड असलेल्या या रुग्णालयांना सकाळी दहा वाजेपर्यंत विहीत नमुन्यात ऑक्सिजन विषयक दैनंदिन माहिती जिल्हा प्रशासनाला ईमेल वर द्यावी लागणार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24