अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- महाराष्ट्रातील पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस 7 रिकामे टँकर घेऊन 19 एप्रिलला रवाना झाली. त्यानंतर गुरुवारी पहाटे 4 वाजता ती विशाखापट्टणम येथे दाखल झाली.
यात ऑक्सिजन भरण्यासाठी 20 तासांचा कालावधी लागणार आहे. ऑक्सिजन भरल्यानंतर रेल्वेतील इंजिनिअरच्या मदतीने हे टँकर रेल्वेवर चढवले जातील.
त्यानंतर रात्रीपर्यंत ती एक्सप्रेस पुन्हा परत महाराष्ट्रात येण्यासाठी रवाना होईल. आंध्रप्रदेशातील विशाखा स्टील प्लांटमधून महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.
या प्लांटमधील अधिकाऱ्यांनी या टँकरमध्ये ऑक्सिजन भरण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. त्यानुसार, सुरुवातीला रेल्वे गाड्यातून हे सात टँकर खाली उतरवले जाते.
त्यानंतर त्यात ऑक्सिजन भरला जाईल. दरम्यान या संपूर्ण प्रक्रियाला किमान 20 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
कळंबोली येथून विशाखापट्टणमकडे ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवणे अधिक व्यवहार्य असल्याने 2 दिवसात येथील प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण करण्यात आले.
त्यानंतर प्रत्यक्ष रिकामे टँकर सपाट वॅगनवर ‘रोल ऑन-रोल ऑफ’ पद्धतीने चढवून सायंकाळी 7 वाजता ऑक्सिजन एक्स्प्रेस रवानाही करण्यात आली.
हे प्रत्येकी 16 मे. टन. द्रवरुप ऑक्सिजन वाहतुकीची क्षमता असलेले विशेष टँकर आहेत. आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स, ताईयो निप्पॉन सॅन्सो इं., एअर लिक्विड, लिंडे आदी कंपन्यांचे हे टँकर आहेत.
नेहमीच्या पुणे-सिकंदराबाद- विजयवाडा रेल्वेमार्गा वर पुणे दरम्यान बोगदे असल्यामुळे ओव्हरहेड वायरची उंची तुलनेत कमी होत असल्याने या मार्गावरुन ऑक्सिजनचे टँकर वाहून नेणे शक्य नव्हते.
त्यामुळे तुलनेत लांबचा असला तरी सूरत- नंदूरबार- जळगाव- नागपूर असा लोहमार्ग निवडण्यात आला आहे. या एक्स्प्रेसच्या माध्यमातून 5 दिवसात 110 मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेवाहतुकीच्या माध्यमातून राज्याला होणार आहे.
ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सुचवल्याप्रमाणे राज्याच्या प्रशासनाने वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी करत रेल्वे मार्गे ऑक्सिजन वाहतूक करता येईल असं केंद्र शासनाला सुचवलं होतं.
त्यानुसार ही एक्स्प्रेस चालवण्यास रेल्वेने मंजुरी दिली. यापुढील काळात ऑक्सिजनच्या निरंतर पुरवठ्यासाठी रेल्वेच्या मदतीने आणखी ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्सिजन तुटवड्यावर मात करणे शक्य होणार आहे.