अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- कोव्हीड संकटात मोठ्या प्रमाणात भेडासवलेल्या ऑक्सीजन तुटवड्यावर कायम स्वरुपी मार्ग काढण्यासाठी माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राहाता येथील ग्रामीण रूग्णालयात सुमारे १ कोटी ५३ लाख रुपयांचा ऑक्सीजन प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोव्हीडच्या संकटात ऑक्सीजन अभावी अनेक निरापराध नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले. ऑक्सिजन बेड अभावी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची झालेली ससेहोलपट ही भयंकर होती.
आशा सर्व पार्श्वभूमीवर या परिस्थितीवर कायमस्वरूपी उत्तर म्हणून आ.विखे पाटील यांनी राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची मागणी करून याचा पाठपुरावा शासनाकडे केला होता.
राहाता तालुक्यात ३ ग्रामीण रुग्णालय,६ प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी रुग्णालय मोठ्या संख्येने आहेत. कोव्हीड संकटाच्या दुसऱ्या संक्रमणात रुग्णांची संख्या वाढल्याने सर्वच आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला.
कोव्हीडसाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयांसह शिर्डी संस्थानच्या व प्रवरा कोव्हीड सेंटर मध्ये बेडची सुविधा उपलब्ध झाली असली तरी सर्वच ठिकाणी ऑक्सिजनच्या समस्येला सामोरे जावे लागले असल्याकडे आ.विखे यांनी लक्ष वेधले होते.
शिर्डी येथे संस्थानने प्रकल्प उभारला असला तरी तिथे निर्माण होणारा ऑक्सिजन हा संस्थानच्या रुग्णालयालाच उपयोगी पडेल.
त्यामुळे ग्रामीण रुग्णालय व इतर रुग्णालयांना पुन्हा ऑक्सिजनची टंचाई भासण्याची शक्यता गृहीत धरून कायम स्वरूपी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्याची मागणी आ.विखे पाटील यांनी केली होती.
आ.विखे पाटीलयांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देवून प्रशासनाने ग्रामीण रुग्णालय राहाता येथे १.५६ कोटी रुपये खर्चाचा ऑक्सीजन प्लॅन्ट उभारणीस मंजुरी देवून उभारणी कामाची वर्कऑॅर्डर सुध्दा दिलेली आहे. या प्रकल्पातून प्रतिदीन १२५ जम्बो ऑक्सिजन सिलेंडर भरण्याची क्षमता आहे.
या प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीसाठी लिक्विडची आवश्यकता नाही. हवेतूनच ऑक्सिजनची निर्मिती होणार असल्याची माहीती देतानाच, या प्रकल्पासाठी २०० के.व्ही क्षमतेचे जनरेटर,
राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात ४० बेडच्या प्रकल्पासाठीच्या ऑक्सीजन पाईप लाईन करीता आमदार निधीतून निधीची उपलब्धता करुन देणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.