पालवी’ची पहिली वृक्षारोपण मोहीम सावेडीतील तीन मंदिरात आनंदम् संस्थेच्या पुढाकारातून निसर्गप्रेमींचा उपक्रम

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- शहराचे नैसर्गिक आरोग्य सुधारण्यासाठी ‘फॉरेस्ट इन द सिटी’ हे ब्रीदवाक्य घेऊन आनंदम् संस्थेच्या ‘पालवी’ उपक्रमाची सुरुवात सावेडीतील तीन मंदिर परिसरात झाली.

या वेळी परिसराची स्वच्छता करून विविध प्रकारची देशी झाडे लावण्यात आली. आनंदम् संस्थेचे संस्थापक विशाल लाहोटी यांच्या पुढाकारातून ‘पालवी’ ही संकल्पना अस्तित्वात आली.

‘केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे’ या सकारात्मक विचारांतून एकत्र आलेल्या सर्व वयोगटातील पुरुष महिलांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेतली.

या मोहिमेंतर्गत शहरातील विविध ओपन स्पेस स्वच्छ करून तेथे झाडे लावण्याची कल्पना लाहोटी यांच्या मनात आली. या उपक्रमाची पहिली बैठक सावेडीतील सहकारनगरमधील तीन मंदिर परिसरात झाली आणि तेथूनच मोहिमेस प्रारंभ करण्याचे बैठकीत ठरले.

वटपौर्णिमेचे औचित्य साधून ही मोहीम सुरू करण्याचे ‘पालवी’ व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपमधून सर्व सदस्यांना कळविण्यात आले. सकाळी 6.30 वाजताच ग्रूपचे सदस्य मंदिर परिसरात उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.

यात विविध क्षेत्रांतील मंडळींचा समावेश होता. परिसरात वाढलेले गवत, साठलेला कचरा आणि मातीचा ढिगारा उचलून त्याचे परिवर्तन रम्य ठिकाणात करण्याचा चंग येथील ज्येष्ठ मंडळींना आधीच बांधला होता.

त्यानुसार त्यांनी कामास सुरुवातही केली होती. त्याच कामास पुढे नेण्याचे ‘पालवी’च्या सदस्यांनी ठरवले. मोहिमेसाठी लागणारे साहित्य काही सदस्यांनीच उपलब्ध केले. त्याचा वापर करून ओपन स्पेसमध्ये वाढलेले गवत,

कचरा, दगड-मातीचे ढिगारे उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला. विविध देशी रोपे लावून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारीही सोपविण्यात आली. या वेळी महिलांचा सहभाग लक्षणीय होता. नगर शहराप्रती असलेले प्रेम निसर्गप्रेमींच्या कृतीतून दिसत होते.

या पहिल्या मोहिमेनंतर आता लवकरच पुढील नवीन ठिकाणी उपक्रम राबविण्यात येणार आहे. निसर्गाशी समर्पित भावनेने सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी 9422227587 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आनंदम् संस्थेचे विशाल लाहोटी यांनी केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24