अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील आंबी व अंमळनेर येथे लाळ्या खुरकूत आजाराने थैमान घातले असून अनेक जनावरांना याची बाधा झाली आहे. त्यातच लाळ्या खुरकूत आजाराची लागण झाल्याने चार गाई दगावल्याने पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
आंबी येथील चारी नं. ०१ वरील भावेश तागड, नितीन मतमोल यांच्या दोन दुभत्या जर्सी गाई व डुकरे वस्तीवरील माजी सरपंच शंकर डुकरे यांची एक गाय लाळ्या खुरकूत आजाराने मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे या गरीब गोपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
तथापी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सातपुते यांनी घटनास्थळी धाव घेत मृत गाईंचे शवविच्छेदन करत नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे. असे असले तरी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. माने यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली प्रवरा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भवर, आंबी-अंमळनेर येथील डॉ. दत्तात्रय साळुंके, डॉ. अजित सालबंदे लसीकरण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे.
“लाळ्या खुरकूतच्या साथीने पशुपालक चिंतेत आहे. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी युद्धपातळीवर लसीकरण सुरू केले आहे. पशुपालकांनी चिंता न करता पशुधनाची काळजी घ्यावी.
याकामी आंबी-अंमळनेर ग्रामपंचायत पशुवैद्यकीय विभागाला सर्वतोपरी सहकार्य करीत असल्याचे उपसरपंच विजय डुकरे यांनी सांगितले.
“पशुवैद्यकीय विभागामार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लसीकरण सुरू केले आहे.
मृत गाईंचा शवविच्छेदन अहवाल हाती आल्यावर पुढील उपचारासंबंधी कार्यवाही केली जाईल. असे डॉ . राजेंद्र भवर पशुवैद्यकीय अधिकारी, देवळाली प्रवरा यांनी सांगितले.