अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :-श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी परिसरात एक बिबट्या व त्याच्या दोन पिल्लांनी दहशत निर्माण केली असल्याने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले.
बिबट्याने शेळ्या व कुत्रे फस्त केल्याने शेतकऱ्यांत दहशतीचे वातावरण आहे. काष्टी, गार, आनंदवाडी, निमगाव खलू, सांगवी, शिपलकरवाडी या भागात बिबट्याने दहशत निर्माण केली. बिबटे दिवसभर शेतकऱ्यांच्या उसाच्या शेतात वास्तव्य करत आहेत.
रात्रीच्या वेळी गावात अन् वस्तीवर राहणाऱ्या अनेक नागरिकांचे कुत्रे, शेळ्या बिबट्याने फस्त केल्या. अनेक घटना घडल्या. मात्र, अश्या अनेक घटकांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, याबाबत वनविभाग अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.
काष्टी परिसरातील चार दिवसांपासून सलग बिबट्या दिसत आहे. पत्रकार दत्तात्रय पाचपुते यांच्या घराजवळील उसामध्ये मोठा बिबट्या व त्याचे दोन पिल्ले चार दिवसांपासून घराच्या अगदी १० ते १५ फुटावरच वावर आहे.
पाचपुते यांनी पाळलेले पाळीव दोन कुत्रे, सुवर्णा कोकाटे यांचा एका कुत्रा बिबट्याने फस्त केले.
याच परिसरातील कोठा येथील बाळासाहेब लोखंडे यांची शेळी बिबट्याने फस्त केली. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी या घटनेची दखल घेऊन बिबटया व त्याच्या छोट्या बछड्यांना तत्काळ जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.