अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- नगर तालुक्यातील देहरे येथे शुक्रवारी सायंकाळी पाच ते सात या वेळेत पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. या पिसाळलेल्या कुत्र्याने सात ते आठ जणांना चावा घेतला. त्यामुळे देहरे परिसरात कुत्र्याची दहशत निर्माण झाली असून ग्रामस्थ कुत्र्याचा शोध घेत आहेत.
चावा घेतलेल्या रुग्णांवर देहरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. देहरे येथे शुक्रवारी सायंकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील चांगुना सखाहरी लांडगे, दीपक दशरथ काळे, शिवाजी महादू कटारे, राजू दादा गायकवाड, पद्मा माेहन काळे, किशाेर रामदास पवार, रंजना भाेसले यांना चावा घेतला. या सर्वांना देहरे प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबिजची लस देण्यात आली.
वैद्यकीय अधिकारी डॉ. पोहरे, निमगावकर आणि पवार यांनी उपचार केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी नगर येथे पाठवण्यात आले.
पिसाळलेल्या चावा घेतलेल्यांना आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी बबनराव करंडे, ग्रामपंचायत सदस्य साजीद शेख, महेश काळे, मच्छिंद्र काळे व ग्रामस्थांनी मदत केली. सध्या गावात दहशतीचे वातावरण असून ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थ पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेत आहेत.