अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेतेमंडळी सध्या महिला अत्याचाराच्या प्रकरणांमुळे चांगलेच चर्चेत आहे.
दरम्यान मंत्र्यांच्या या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे, नुकतेच या मुद्द्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रेणू शर्मा, करुणा शर्मा यांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सोमवारी केली.
पंकजा म्हणाल्या कि, वनमंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला खरा; पण सदर प्रकरणात राजीनामा देण्यात दिरंगाई झाल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
शिवाय यावेळी त्यांनी सध्याच्या प्रसंगाची पार्श्वभूमी आणि संदर्भ घेत धनंजय मुंडे यांच्यावरही काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या काही गंभीर आरोपांच्या धर्तीवर त्यांच्याही राजीनाम्याची मागणी केली आहे.
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता याची चौकशी व्हावी आणि पूजाला न्याय मिळावा अशी ठाम भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली.
संजय राठोड यांनी फार आधी पदाचा राजीनामा देणे अपेक्षित होते; पण तसे झाले नाही असे म्हणत चुकीच्या प्रवृत्तींना आळा घातला गेलाच पाहिजे हीच बाब त्यांनी उचलून धरली.