पंकजा मुंडे यांचा एल्गार ! आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. सरकारचा धिक्कार करण्यासाठी आणि आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाहीत हा नारा घेऊन आपण 26 जूनच्या रास्ता रोको आंदोलनात ताकदीनिशी उतरायचे आहे.

या चक्का जाम आंदोलनाने शहर दणाणून सोडा असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी रविवारी पुणे व पिंपरी चिंचवड मधून ओबीसी आंदोलनाचे रणशिंग फुंकले.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा लढा हा ‘व्होट बँकेचा’ नसून भाजपच्या मुळ तत्त्वांचा, सन्मानाचा आणि संस्काराचा असल्याचे त्या म्हणाल्या.

ओबीसींचे राजकीय आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने २६ जून रोजी राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

या पार्श्‍वभूमीवर पंकजा मुंडे यांनी पुणे व पिंपरी चिंचवड येथे भाजपाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. बैठकीस शहर जिल्हाध्यक्ष जगदीश मुळीक, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आ. माधुरी मिसाळ, आ. महेश लांडगे,

आ. लक्ष्मण जगताप, पिंपरीच्या महापौर माया ढोरे, उमा खापरे, सदाशिव खाडे, आ. सिद्धार्थ शिरोळे, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, ॲड. मोरेश्वर शेडगे, अशोक मुंडे, योगेश पिंगळे, दत्ताभाऊ खाडे आदी उपस्थित होते. संघर्ष ही आपली ताकद आहे.

कोरोना महामारीनंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मोठा विषय घेऊन आपण याची सुरवात करत आहोत. बहूजनांना ताकद देण्याचे काम ज्यांनी केले, ओबीसींच्या आरक्षणाचा पाया ज्यांनी रचला त्या छत्रपती शाहू महाराज यांच्या २६ जून हया जन्मदिवशी आपण सामाजिक न्यायाची मागणी करत आहोत.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा हा लढा कुठल्या व्होट बँकेसाठी नसून भाजपच्या मुळ तत्वांचा, सन्मानाचा आणि संस्काराचा आहे.

समाजातील वंचित वर्गच जर धोक्यात येत असेल तर राष्ट्र धोक्यात येते. प्रत्येक लोकप्रतिनिधींनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह आंदोलनात सहभाग घेऊन शहर दणाणून सोडावे असे आवाहन पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24