अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रत्यक्ष शाळा सुरु होण्यास आनखी काळावधी असताना, नवीन शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या पार्श्वभूमीवर कापड बाजार येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेची पालकांची सहविचार सभा ऑनलाईन पार पडली.
यामध्ये नवीन शैक्षणिक वर्ष कसे असणार?, विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण, अभ्यासाची पध्दत, मुलांची शैक्षणिक प्रगती या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. या सभेत पालकांनी उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवून विविध सूचना देखील मांडल्या.
शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लंके म्हणाले की, रयत ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सकाळी दररोज अभ्यासाची चाचणी घेतली जाणार आहे. झूम अॅपद्वारे रोज ऑनलाईन तासिका मागील वर्षीप्रमाणे होणार असून, कोरोना काळात उत्तमपणे नियोजन करुन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला होता.
या वर्षी देखील ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे. त्याचे वेळापत्रक पालकांना देण्यात आले. शासनाकडून पुस्तके आली नसल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांना रयत सुपर अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे संकेतस्थळ, विज्ञान खेळणी व पीडीएफ पुस्तके उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
लेखन कौशल्य वाढविण्यासाठी स्वयंअध्ययन पुस्तिका विद्यार्थ्यांना तयार करुन देण्यात आली आहे. दररोजचा अभ्यास करुन विद्यार्थी आपल्या वर्गाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणार आहेत. तर आठवड्यातून एक दिवस पालक त्या वह्या शाळेत तपासणीसाठी आनणार आहेत.
तर विद्यार्थ्यांना कृतीशील उपक्रम दिला जाणार आहे. विद्यार्थी पालकांच्या मदतीने हा उपक्रम पुर्ण करणार असल्याच्या सूचना लंके यांनी पालकांना दिल्या. तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडूळे व उत्तर विभागाचे निरीक्षक टी.पी. कन्हेरकर यांनी पालकांना महत्त्वाचे मार्गदर्शन केले.