अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- नगरमधील कापड बाजार येथे टू व्हिलर, फोर व्हिलर तसेच व्यावसायिकांना संपूर्ण मनपा रस्त्यावर केलेले अतिक्रमण यामुळे या भागात पार्किंगची व्यवस्था नाही, त्याचप्रमाणे अत्यंत गजबजलेला भाग असून, या भागात महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही याबाबत शिव राष्ट्र सेनेच्यावतीने मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे यांना निवेदन देण्यात आले.
महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ऍड.अनिता दिघे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, दलित आघाडीचे अनिल शेकटकर, ओबीसी आघाडीचे बाबासाहेब करपे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय शेडाळे, भिंगार मंडल अध्यक्ष राकेश सारवान आदि उपस्थित होते.
यावेळी दिघे म्हणाल्या, कापड बाजार हा शहरातील मोठी बाजार पेठ असल्याने शहरासह जिल्ह्यातून अनेकजण या ठिकाणी येत असतात, परंतु या ठिकाणी दुकानदार, छोटे व्यवसायिकांनी अतिक्रमण केल्याने या ठिकाणी पार्किंगचीच व्यवस्था नाहीये.
त्यामुळे रस्त्यावरच गाड्या पार्क होत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्याचप्रमाणे या एवढ्या मोठ्या बाजारपेठेत स्वच्छतागृहांची कमतरता आहे, विशेषत: महिलांसाठी स्वच्छतागृहच नसल्याने महिलांची मोठी कुंचबना होत आहे.
कापड बाजारातील अतिक्रमणे, पार्किंग, चोर्या आणि महिलांसाठीचे स्वच्छतागृह याकडे मनपाचे पुर्णपणे दुर्लक्ष होत असून, याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा देण्यात आला आहे.