पारनेर भाजप शहराध्यक्ष औटी यांचा राजीनामा! तालुकाध्यक्षांवर केले हे गंभीर आरोप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-पारनेर तालुक्यातील भाजपा शहराध्यक्ष भिमाजी औटी यांनी पक्षाच्या तालुकाध्यक्षांवर घराणेशाही व हुकुमशाहीचे आरोप करीत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

राजीनाम्यात औटी यांनी नमूद केले आहे की, माझा राजीनामा हा कुठल्याही व्यक्तीनिष्ठ राजकीय द्वेषापाई दिला नाही. गेली चार वर्ष पक्षाचे ध्येय धोरणे अंगीकारुन एक शहराध्यक्ष म्हणून नव्हे तर एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम केले, परंतु पारनेर तालुकाध्यक्ष पक्षाची ध्येय धोरणे विसरुन घराणेशाहीचे व नातलगांचे हित जोपासत राजकीय व्यापार करत आहेत.

त्यामुळे शहरासह तालूक्यात पक्षाची वाताहत होत आहे. याबाबत मी अनेक वेळा माझ्या तक्रारी पक्ष श्रेष्ठींच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला परंतु त्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले गेले. आगामी नगर पंचायत निवडणुक बाबतविद्यमान तालुका अध्यक्ष आपले नातेवाईक आणि संबंधितांना घेवून शहर विकास आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली करत आहेत.

येथेही शहर अध्यक्षांना जाणीवपुर्वक दुर ठेवले गेले. या नेतृत्वामुळे खेदाने सांगावेसे वाटते की, यांच्या या व्यापारी धोरणामुळे नगरपंचायतीत एकही उमेदवार विजयी होवू शकणार नाही. याला जबाबदार तेच असतील. ही फक्त माझ्याच मनातील खदखद नसुन ही तालुक्यातील भाजप प्रणित हितचिंताकांची ही खदखद आहे.

तसेच पारनेर शहरासह तालुक्यात भाजपाची वाताहात करणाऱ्या तालुका अध्यक्षाचा जर राजीनामा घेतला नाही तर विद्यमान तालुका अध्यक्षावर नाराज असणारा एक मोठा पदाधिकारी वर्ग माझ्या सारखा निर्णय घेतील याची नोंद घ्यावी.

अहमदनगर लाईव्ह 24