अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :-राहुरी येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केली आहे.
दातीर हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर श्री.कर्डिले यांनी शनिवारी (दि.११) जिल्हा पोलिस अधीक्षक मनोजकुमार पाटील यांची भेट घेवून त्यांना मागणीचे निवेदन दिले.
तद्नंतर माध्यमांशी संवाद साधताना श्री.कर्डिले यांनी दातीर हत्या प्रकरणाचे सत्य जनतेसमोर येण्यासाठी सीबीआयमार्फत तपास होणे गरज असल्याचे नमूद केले. राहुरीत जंगलराज म्हणजे बिहारसारखी परिस्थिती निर्माण झाली असून,
सत्ताधारी हे गुन्हेगारांना पाठिशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्या भूखंडात ऊर्जामंत्री तनपुरे यांच्या मुलाची व मेव्हण्याची भागीदारी असल्याचा दावाही त्यांनी केला. ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावरही त्यांनी कडव्या शब्दात टिकास्र सोडले.
दरम्यान, कर्डिले यांच्या गंभीर आरोपामुळे राज्याचे ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. रोहिदास दातीर यांची हत्या भूखंड प्रकरणातून झाली असून, तो भूखंड उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कंपनीशी संबंधित आहे.
भूखंड संबंधी तक्रारी करून अडथळा आणत असल्यानेच दातीर यांची हत्या झाली आहे, असा खळबळजनक आरोप कर्डिले यांनी केला आहे. ते म्हणाले की, त्या संबंधाचे पुरावे आपल्याकडे आहेत.
ते पुढे म्हणाले की, राहुरीतील १८ एकर भूखंडाच्या मालकीसंबंधी पत्रकार दातीर यांनी सतत तक्रारी केल्या. दातीर यांच्यामुळे भूखंडात अडचणी येत असल्यानेच त्यांची हत्या करण्यात आली. या जागेत सोहम ट्रान्सपोर्ट नावाची कंपनी असून,
सोहम हे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे चिरंजीव आहेत. या कंपनीत तनपुरे यांचे मेव्हणे देशमुख हेही भागीदार आहेत. हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे हाही भागीदार आहे. दातीर यांना भूखंडातील पठारे कुटूंबियांनी मुखत्यारपत्र दिले होते.
त्याआधारे दातीर हे भूखंडासाठी कायदेशिर बाजू मांडत होते. म्हणूनच मोरे याच्याकडून दातीर यांना अनेकदा धमक्या आल्या. दातीर यांच्या पत्नीने पोलिसांकडे तशा प्रकारची तक्रारीही दिल्या होत्या. मात्र पोलिसांनी कारवाई केली नाही तसेच दातीर यांना संरक्षणही दिले नाही.
१८ एकरची मालमत्ता लाटण्यासाठीच दातीर यांची हत्या घडवून आणली आहे. दातीर हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून इतर आरोपींविरुद्धही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.