अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-कोरोनाचं संकटाने आधीच चिंताग्रस्त असलेया शेतकऱ्यांमध्ये तसेच पशुपालकांची चिंता वाढवणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द व जेऊर हैबती गावाचे परिसरातील जनावरांना लाळ्या खुरकुतासह घटसर्प सदृश्य रोगाची लागण होऊन १९ गाई दगावल्याची घटना घडल्याने पशुधन पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील भेंडा खुर्द व जेऊर हैबती गावाचे परिसरातील शेतकऱ्यांच्या जनावरांना मोठ्या प्रमाणात लाळ्या खुरकुताची लागण झाल्याचे दिसून आले. या रोगामुळे १९ गाई दगावल्या आहेत.
याबाबतची माहिती मिळताच जिल्हा परिषद पशु संवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी जिल्ह्यातील सर्व पशुधन विकास अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ.सुनील तुंबारे यांनी दगावलेल्या गाईंचे शवविच्छेदन करून त्याचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. यामध्ये घटसर्प सदृश्य लक्षणे आढल्याची माहिती आहे.
मात्र तपासणी अहवाल आल्यावरच त्यावर शिक्का मोर्तब होणार आहे. दरम्यान जिल्हा परिषद पशु संवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांचेशी संपर्क साधला असता लसीचे ९ हजार डोस तातडीने मागविण्यात आले असून लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
रिकव्हरी रेट चांगला असून पशुधन पालकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन गडाख यांनी केले आहे.