अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाची लाट हळूहळू ओसरू लागली आहे. यामुळे नागरिकाना काहीसा दिलासा मिळू लागला होता. तोच आता जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे रुग्ण वाढू लागले आहे.
यामुळे आता पुन्हा एकदा चिंता वाढली असल्याचे दिसू लागले आहे. नुकतेच म्युकरमायकोसिस आजार झाल्याने पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपे येथील 39 वर्षीय तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हॉटेल व्यवसायीक असलेल्या या तरूणास करोनाची बाधा झाली होती. त्यापाठोपाठ म्युकरमायकोसीस झाल्याने त्यास दोन दिवसांपूर्वी पुणे येथे शस्त्रक्रियेसाठी हलविण्यात आले होते.
दरम्यान, आठ दिवस सुपे येथील खासगी रूग्णालयात आठ दिवस उपचार घेतल्यानंतर रूग्णास म्युकरमाकोसीसची बाधा झाल्याचे निदान झाले. त्यानंतर शुक्रवारी रूग्णास पुण्यातील ससून रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले होते.
ससून रूग्णालयात रूग्णावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. परंतू त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण अधिक असल्याने साखरेची पातळी कमी करण्याचे डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू होते.
मात्र, साखरेचे प्रमाण कमी न झाल्याने त्यांच्यावरील शस्त्रक्रीया होऊ शकली नव्हती. त्यातच रविवारी पहाटे त्यांचे निधन झाले.
पुण्यातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. म्युकरमायकोसीसने मृत पावलेल्या हॉटेल व्यवसायिक तरुणाच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.