अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- देशाची सर्वोच्च बँक आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँकेतर्फे आज एक महत्वपूर्ण सूचना करण्यात आली आहे. यानुसार काही तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सिस्टीम अपडेट केले जाणार आहेत.
त्यामुळे उद्या २३ मे रोजी काही तासांसाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर अर्थात NEFT सेवा बंद असणार आहे. याबाबतची माहिती आरबीआयनं ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
एनईएफटी सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी रात्री १२ ते २३ मे रोजी दुपारी २ वाजेपर्यंत ही सेवा बंद असणार आहे. त्यामुळे या वेळेत पैशांचा व्यवहार करता येणार नाही.
जवळपास १४ तास ही सेवा बंद असणार आहे. अपग्रेड दरम्यान बँक खातेधारकांना त्याचे अपडेट मिळतील असंही आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे.
जाणून घ्या काय आहे NEFT :- एनईएफटीच्या माध्यमातून दोन लाखांपर्यंतचा व्यवहार केला जाऊ शकतो. या माध्यमातून एका बँकेतून दुसऱ्या बँके खात्यात थेट पैसे पाठवण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. मात्र यासाठी दोन्ही बँक खातेधारकांकडे इंटरनेट बँकिंग सेवा उपलब्ध असणं गरजेचं आहे.
डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी ६ जून २०१९ रोजी आरबीआयने NEFT सेवा निशुल्क केली आहे. ही सुविधा पूर्वी सकाळी ८ ते संध्याकाळी ७ पर्यंत होती. मात्र आता ही सुविधा २४ तास उपलब्ध असते.