अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- वीजबिल वसुलीसाठी महावितरणने राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायतींची वीजतोड मोहीम सुरू केली आहे. महावितरणच्या आक्रमक धोरणामुळे अनेक ग्रामपंचायतींचे वीज कनेक्शन खंडीत करण्यात आले आहे.
यामुळे अनेक गावांवर अंधाराचे सावट निर्माण झाले आहे. राहुरी तालुक्यात ग्रामपंचायतींकडे विजबिलापोटी दोन कोटी 80 लाख 69 हजार रुपये एवढी विजेची थकबाकी आहे. त्यासाठी महावितरणचा वसुलीसाठी आटापिटा सुरू आहे.
वसुलीसाठी महावितरणने राहुरी पंचायत समिती प्रशासनाला संबंधित ग्रामपंचायतींनी पथदिवे व पाणीपुरवठा देयके थकबाकी भरण्यासाठी पत्राद्वारे गळ घातली आहे. त्यावरून संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांनी ग्रामपंचायतींना विजबिल भरण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र, आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या अनेक ग्रामपंचायतींच्या तिजोरीतही खडखडाट असल्याने गटविकास अधिकार्यांच्या आदेशाला ग्रामपंचायत प्रशासन किती प्रतिसाद देईल? यावरच आता बंद पडलेला पाणीपुरवठा आणि पथदिव्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
महावितरणने अनेक ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन खंडीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे. यामुळे ग्रामपंचायतीचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा गोत्यात आला असून पथदिवेही बंद झाल्याने काही गावे अंधारात बुडाली आहेत.
त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, राज्याचे उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी याप्रश्नी लक्ष घालून तातडीने यावर तोडगा काढण्याची मागणी राहुरी पंचायत समितीचे सदस्य सुरेश बानकर यांनी केली आहे.
महावितरणने ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन खंडीत करू नये, थकीत वीजबिलातील 50 टक्के रक्कम माफ करून उर्वरित 50 टक्के रक्कम हप्त्याहप्त्याने वसूल करावी, यासाठी ना. तनपुरे यांनी संबंधित महावितरणाला आदेश द्यावेत, अशीही मागणी बानकर यांनी केली आहे