अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :- नेवासे तालुक्यामध्ये तपासणी किट नसल्याने व ऑक्सिजनसह आरोग्य सुविधाची कमतरता असल्याने लोक तडफडून घरी मरत आहेत,
अशा शब्दात माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या, तर खासदार सदाशिव लोखंडे यांनी आम्ही घेतलेल्या बैठकांमधील कोणतेही गोष्टीची पूर्तता झालेली नसल्याने बैठकीला काहीच अर्थ राहिलेला नाही,
अशी खंत व्यक्त केली नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेवासे तालुक्याची आढावा बैठक पंचायत समितीच्या सभागृहात घेतली.
वंचित आघाडीच्या संजय सुखदान यांच्या काळे झेंडे दाखवण्याच्या इशाऱ्यामुळे आधीच वादग्रस्त ठरलेली ही बैठक केवळ अर्धा तासातच संपली.
सुखदान, भाजपचे मनोज पारखे, निरंजन डहाळे यांनी निषेध करण्याचा हक्क डावलल्यामुळे पोलिस ठाण्यात घोषणाबाजी केली.
बैठकीला जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी अजित थोरबोले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, नेवासे पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगणे, प्रांत अधिकारी गणेश पाटील यांच्यासह अप्पर पोलिस अधीक्षक दीपाली काळे,
प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा आदी उपस्थित होते. आरोग्य अधिकारी व तहसीलदार यांनी कोरोना अहवाल सादर केला.
यावेळी माजी आमदार पांडुरंग यांनी कुकाणे आरोग्य केंद्र व चांदा आरोग्य केंद्रांविषयीच्या तक्रारी करताना तालुक्यात व या परिसरामध्ये कोरोनाचे टेस्टच होत नसल्याने प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्ण घरातच तडफडून मरत असल्याचे सांगितले.
चांदा येथील पंचायत समितीचे माजी सभापतीला देखील ऑक्सिजन बेड उपलब्ध झाले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. दरम्यान, खासदार सदाशिव लोखंडे यांनी मागील आठवड्यात घेतलेल्या आढावा बैठकीत दिलेल्या सूचनांचे पालन झाले नाही.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ऑक्सिजन बेड उपलब्ध नाहीत आणि दोन ॲम्बुलन्सचे आश्वासन पाळले गेले नसल्याचे सांगताना आपण घेतलेल्या बैठकीला काही अर्थच राहिला नसल्याची खंत व्यक्त केली.