प्रसिद्धीसाठी कोण हपापलंय हे जनतेला माहीत आहे !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- नगराध्यक्ष व आमदार प्रसिद्धीला हपापलेले आहेत, असा आरोप करणाऱ्या उपनगराध्यक्षांना दोष देता येणार नाही. “संजीवनी’वर तयार होऊन आलेल्या पत्रकावर त्यांचे फक्त नाव असतेे, असा टोला नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी मारला.

पत्रकात म्हटले आहे, नगरपरिषदेची निवडणूक होण्यापूर्वी कुठलाही कार्यादेश नसताना कोल्हे यांनी घाईघाईने वाचनालयाची इमारत, नगरपरिषद कार्यालय व जिजामाता उद्यान कामांचे भूमिपूजन करत कोनशिला लावली.

पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता नसल्यानेच कोनशिला लावून घेतल्या, पण त्या कोनशिलांचे काम करणाऱ्यास अजूनही बिल दिले गेले नाही. २०१७ मध्ये कार्यादेश नसताना बिपिन कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कामांचे भूमिपूजन करण्याचा आग्रह तुम्हीच धरला होता, हे आठवत नाही का, असा सवाल वहाडणे यांनी केला.

सध्या होत असलेल्या विकासकामांचे भूमिपूजन केले, तर नगराध्यक्ष व आमदारांना प्रसिद्धीची हौस आहे असे हास्यास्पद आरोप केले जातात. मी तर आजपर्यंत एकदाही माझ्या फोटोचा फ्लेक्स बोर्ड लावू दिलेला नाही, लावलेला नाही.

एकदा तर लावलेला फ्लेक्स काढायला लावला. आजपर्यंत बहुसंख्य वेळा ध्वजारोहण करण्याची, भूमिपूजन-उदघाटन करण्याची दुसऱ्यांनाच संधी दिली. कोल्हे तर कोरोना रुग्णांना पुरणपोळ्या वाटतानाचेही फोटो काढून किळसवाणी प्रसिद्धी मिळवतात.

पुरण पोळ्याही संजीवनीच्याच खर्चाने. खरेतर कोल्हे यांनी नगरसेवकांचा वापर करून कशा प्रकारचे डावपेच नगरपरिषदेत केले, हे जनतेला साडेचार वर्षांत चांगलेच अनुभवास आले आहे. मी नगरसेवकांना दोष देणार नाही, कारण येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी संजीवनीचा आदेश पाळावाच लागतो.

केवळ काही नगरसेवकच नव्हे, तर अजून ४-५ भाटही याच कामासाठी पोसलेले आहेत. महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीच्या फ्लेक्सवरही पती-पत्नीचे फोटो का असतात? फ्लेक्सचा खर्चही शेतकरी सभासदांच्या संजीवनीतूनच भागवला जातो ना?

तुम्हीच मला बोलायला भाग पाडता. कोरोनाच्या संकटात मी टीका करायची नाही, असे ठरवले होते, पण तुम्ही शांत रहाणार नसल्याने नाईलाजाने प्रतिक्रिया द्यावीच लागते, असे वहाडणे यांनी म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24