अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- कार्यालयात वाढदिवस साजरा करणे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील तहसीलदारांच्या अंगलट आला आहे.
गेल्यावर्षी त्यांनी साथरोग प्रतिबंध कायदा धाब्यावर बसवत, चक्क नेवासा तहसील कार्यालयातच दणक्यात वाढदिवस साजरा केला होता.
त्याविरोधात मोठ्या प्रमाणात आवाज उठविण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस यंत्रणेला तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदने देण्यात आली. मात्र जिल्हा प्रशासनाने कारवाईच्या नावाखाली कागदी घोडे नाचविले.
प्रशासनचं तहसीलदारांना पाठिशी घालत असल्याने याविरोधात हायकोर्टात दाद मागण्यात आली आहे. तहसीलदार सुराणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे.
रहिवाशी संजय नराळे यांनी सदर याचिका दाखल केली आहे. ॲड. राहुल अवसरमोल त्यांची बाजू मांडत आहेत. याचिकेत म्हटल्यानुसार, २३ जून २०२० रोजी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी जमावबंदीचा भंग करुन शासनाने कोरोना काळात घालून दिलेले
नियम पायदळी तुडवत १५ ते २० जणांसोबत धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे, तहसील कार्यालयातच त्यांनी वाढदिवस साजरा केला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. मास्क न वापरल्याने कोरोनाच्या नियमांना हरताळ फासण्यात आला.
तहसीलदार हे तालुका दंडाधिकारी असतात. त्यांनीच कोरोना प्रतिबंध नियमावली पायदळी तुडवली. त्याविरोधात जिल्हाधिकारी आणि पोलीस यंत्रणेकडे अनेकांनी तक्रारी केल्या.
पण कारवाई करण्यात आली नाही की गुन्हा दाखल करण्यात आला नाही. सर्वसामान्यांना एक न्याय आणि अधिका-यांना सूट असा अन्याय का, असा सवाल याचिकेत करण्यात आला आहे.