अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- मुलगा अंध, नातू अंध तर एक डोळ्याने अंध असलेल्या आजीबाईच्या जीवन देखील दुसर्‍या डोळ्याला झालेल्या काचबिंदूमुळे अंधकारमय बनले होते. नुकतेच आजीबाईच्या डोळ्याची अवघड काचबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी करुन, या अंध कुटुंबीयांच्या जीवनात फिनिक्स सोशल फाऊंडेशनने प्रकाश वाट निर्माण केली आहे.

ही गोष्ट आहे, लातूर येथील शेशाबाई गणपत (सध्या वास्तव्य अहमदनगर एमआयडीसी) मोरे यांची. शेशाबाई यांच्या एका डोळ्यावर यापुर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र ही शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याने त्यांच्या एका डोळ्यास अंधत्व आले. त्यांचा मुलगा देखाल जन्मत: अंध असून, पतीच्या निधनानंतर कबाड कष्ट करुन त्यांनी मुलाला सांभाळले. मुलाच्या लग्नानंतर देखील त्यांचा नातू जन्मत: अंध झाला.

यावर मात करुन आई व मुलाने नातूला उच्च शिक्षित केले. सध्या तो स्पर्धा परीक्षा देत आहे. कामानिमित्त शेशाबाई राहुरी तालुक्यात आल्या. त्यांनी गाडगे बाबा आश्रम शाळेत काम केले. मात्र सहा ते आठ महिन्यापुर्वी एका डोळ्यास काचबिंदू झाल्याने त्यांची दृष्टी कमी-कमी होत जाऊन शेवटी डोळ्यापुढे अंधकार पसरला.

यानंतर काम न करता ते आपल्या मुलासह अहमदनगर एमआयडीसी येथे राहण्यास आल्या. काचबिंदूचा अंतिम टप्पा असल्याने ही अवघड शस्त्रक्रिया करण्यास अनेक डॉक्टरांनी नकार दिला. तर मोठ्या हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रियेसाठी खर्च अधिक सांगण्यात आला.

आर्थिक परिस्थिती बिकट असताना त्यांची निराशा झाली. या कुटुंबीयांचे जीवनच पुर्णत: अंधकारमय बनून गेले. काही दिवसांपुर्वी गणेशोत्सव काळात फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे येथे घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरात आजीबाईचा अंध मुलगा त्यांना उपचारासाठी घेऊन आला.

फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी या अंध कुटुंबीयांची परिस्थिती जाणून घेऊन, त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी पाठपुरावा सुरु केला. शिबीरात तपासणी करुन त्यांना शस्त्रक्रियेची दिनांक व वेळ देण्यात आली. त्यांचा डोळा वाचविण्यासाठी अथक प्रयत्न करुन विविध चाचण्या करण्यात आल्या. आखेर आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या नेत्र विभागात या आजीबाईच्या एका डोळ्यावर काचबिंदूची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

नेत्रतज्ञ डॉ. किरण शिंदे यांनी ही अवघड शस्त्रक्रिया केली. आजीबाईच्या उपचारासाठी प्रशासकीय अधिकारी आनंद छाजेड यांचे सहकार्य लाभले. ही शस्त्रक्रिया होत असताना फिनिक्सचे पदाधिकारी व कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये हजर होते. फिनिक्स फाऊंडेशनच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शिबीराच्या माध्यमातून शेशाबाई यांना नवदृष्टी मिळाली.

निकामी झालेल्या डोळ्यास पुन्हा दृष्टी लाभल्याने आजीबाईंना साक्षात गणपती पावला. अंध कुटुंबीयांच्या जीवनात जगण्याची एक नवी उमेद फिनिक्स फाऊंडेशनने निर्माण केली. यशस्वी शस्त्रक्रिया होऊन परतलेल्या आजीबाईंचा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी सत्कार केला व पुढील निरोगी आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मुलगा अंध, नातू अंध तसेच स्वत:वर देखील अंधत्व आल्याने स्वत:चा व कुटुंबातील सदस्यांचा सांभाळ करणे अवघड बनले होते. पुढील जीवन जगण्याची उमेद सोडून दिली होती. मात्र फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून डोळ्यावर झालेल्या यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे नवदृष्टी मिळाली.

यामुळे जीवन जगण्याची उमेद मिळाली. नवदृष्टी मिळण्यासाठी साक्षात गणपती बाप्पा पावल्याची बोलकी प्रतिक्रिया शेशाबाई मोरे यांनी व्यक्त केली.