अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील अलाहाबाद उच्च न्यायालयाची टिप्पणी वादग्रस्त ठरली आहे. 15 वर्षांहून वयाने अधिक असलेल्या पत्नीसोबत शारीरिक संबंध प्रस्तापित करणे बलात्काराच्या श्रेणीत येत नाही,
असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटले आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम 315 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेत हा नियम असल्याचा हवालाही न्यायाधीशांनी दिला आहे.
या सुधारणेनुसार, 15 वर्षांहून अधिक वयाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध प्रस्तापित करणे बलात्काराच्या श्रेणीत येत नाही. अलाहाबाद न्यायालयासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी दाखल झाले होते.
या प्रकरणात हुंड्यासाठी छळ, अल्पवयीन पत्नीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि अप्राकृतिक शारीरिक संबंध असे आरोप आरोपी पतीवर ठेवण्यात आले आहेत.
या प्रकरणी उच्च न्यायालयाने आरोपी पतीला जामीन मंजूर केला आहे. मुरादाबादची रहिवासी असलेल्या पत्नीने आपल्या पतीविरुद्ध 8 सप्टेंबर 2020 रोजी भोजपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.
पतीने याविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आरोपी पती खुशाबे अली याच्या जामीन याचिकेवर न्यायमूर्ती मो असलम यांनी सुनावणी केली.
आरोपी पतीच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, मॅजिस्ट्रेटसमोर दिलेल्या जबाबात पीडितेने अप्राकृतिक संबंध बनवण्याचे आणि पतीच्या भावांकडून बलात्काराच्या आरोपांना नकार दिला होता.