अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-अगस्ती साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मधुकर पिचड यांनी आमच्याकडे तुमच्या आर्थिक गैरव्यवहारांची फाईलच तयार आहे,
ठरवले तर तुमची पळतीभुई थोडी करू अशी दर्पोक्ती करून आम्ही अगस्तिवर विचारलेल्या कर्जाबाबतच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देण्याऐवजी बगल देऊन सभासदांची दिशाभूल केली.
तर संचालक मच्छिंद्र धुमाळ यांनीही पुणे बाजार समितीत माझ्या प्रशासकाच्या कालावधीत माझ्यावर शंभर कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप वार्षिक सभेनंतर केला. यासंदर्भात मी अकोले पोलिस ठाण्यात मच्छिंद्र धुमाळ यांच्याविरुध्द मानहानिकारक गुन्हा दाखल केला.
याबाबत मधुकर पिचड व मच्छिंद्र धुमाळ यांच्याकडील सर्व पुरावे न्यायालयात हजर करावेत, मी जर दोषी ठरलो, तर होईल ती शिक्षा भोगण्यास मी तयार आहे.
अगस्तीवरील कर्जाबाबत आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांवर समोरासमोर बसून चर्चा करण्याची तयारी दाखवावी,
असे आव्हानच अगस्ती साखर कारखान्यात व्यवस्था परिवर्तन घडवून आणण्यात आघाडीवर असलेले पुणे बाजार समितीचे निवृत्त प्रशासक बी. जे. देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिले.
अकोल्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बी. जे. देशमुख बोलत होते. यावेळी अगस्ती समन्वय समितीचे अध्यक्ष व शेतकऱ्यांचे नेते दशरथ सावंत होते.
पत्रकार परिषदेपूर्वी नुकतेच राष्ट्रवादीत डेरेदाखल झालेले सीताराम गायकर समर्थक व अकोले बाजार समितीचे सभापती पर्बतराव नाईकवाडी हे हजर न राहता दालनाबाहेर बसून होते.