अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात सर्वत्रच खड्ड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचा त्रास नागरिकांसह वाहनधारकांना सहन करावा लागतो आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी कमालीचा संताप निर्माण झाला आहे.
नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोपरगाव नगरपालिकेचा निषेध करत रस्त्यावर शेणाचा सडा व फुलांच्या पाकळ्या टाकत आंदोलन केले. कोपरगाव शहरातील रस्त्यांना तलावाचे स्वरूप आलेले असुन त्याची अवस्था दयनीय झालेली आहे.
याकडे नगरपालिका पदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. येणाऱ्या सणासुदीच्या काळात खड्डे व धुळीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सतीष काकडे यांच्या नेतृत्वाखाली दि. २७ राजी शुक्रवारी नेहरुभाजी बाजार येथील गुरुद्वारा रस्त्यावर शेणाचा सडा टाकून अनोख्या पद्धतीने आंदोलन करत पालिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला.