अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- आयटी पार्कच्या पोलखोल प्रकरणावरून विनयभंगाचा गुन्हा दाखल असणाऱ्या शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या समर्थनार्थ काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, अहमदनगर महिला काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस,
नगर शहर ब्लॉक काँग्रेस, नगर शहर ब्लॉक युवक काँग्रेस, नगर शहर उद्योग व वाणिज्य काँग्रेस विभाग आदी विविध फ्रंटल, सेल यांच्यावतीने नगर शहरामध्ये एमआयडीसी आणि विविध ठिकाणी किरण काळे यांच्या समर्थनार्थ “सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही !” असे फलक लावले आहेत.
या फलकांवरील निषेधाच्या संदेशाची शहरभर चर्चा सुरू झाली आहे. “नीच” राजकारण करत खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या “त्यांचा” जाहीर निषेध ! असे या फलकावर नमूद करण्यात आले आहे. शहराच्या आमदारांनी नीच राजकारण करत किरण काळे यांनी वास्तव जनतेसमोर आणल्याबद्दल विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फलकावर “त्यांचा” जाहिर निषेध असे लिहीत आमदारांचा निषेध या फलकांवर नोंदविला आहे. शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे याबाबत म्हणाले की, किरण काळे हे स्वच्छ आहेत.
काँग्रेसचे सर्व पदाधिकारी त्यांच्या बरोबर आहेत.आयटी पार्कची पोलखोल करताना काँग्रेसची टीम त्यांच्याबरोबर होती त्यावेळी असा कुठलाही प्रकार किरण काळे यांनी केलेला नाही. ते सर्व प्रकारच्या पोलीस कारवाईला तसेच अटकेला देखील सामोरे जाण्यासाठी तयार आहेत. मात्र शहराच्या आमदारांच्या या नीच कृत्याची किळस शहरातील जनतेला येत असून असे किळसवाणे कृत्य करणारे लोकप्रतिनिधी शहरासाठी घातक आहेत अशा संतापाचा सूर शहरामध्ये सर्वत्र पाहायला मिळत असल्याचे गारदे यांनी म्हटले आहे.
आयटी पार्क पोलखोल प्रकरणात विनयभंगाचा खोटा गुन्हा खोटा राष्ट्रवादीच्या आमदारांनी पोलिस यंत्रणेवर राजकीय दबाव आणत दाखल करायला लावल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मागील चार दिवसांपासून या विषयावरून नगर शहरामध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ उठत आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील हा संघर्ष रोज तीव्र होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, किरण काळे हे फरार असल्याच्या वावड्या राष्ट्रवादीकडून उठवल्या जात असतानाच काळे यांनी स्वतः त्यावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे दोन दिवसांपूर्वी मी इथेच असल्याचे स्पष्ट केले होते.
काल मनसेचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या “युवा अंडरग्राउंड” या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला किरण काळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच ते शहरात विविध ठिकाणी भेटीगाठी देताना तसेच काँग्रेस कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांना भेटताना पहायला मिळत असल्यामुळे ते फरार असल्याच्या वावड्याच आहेत हे स्पष्ट झाले आहे.