अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- कोरोनामुळे बंद असलेली रेल्वे पुन्हा वेगात धावू लागली आहे. यात विविध मार्गांनी उत्पन्न वाढीसाठी रेल्वे प्रयत्न करत आहे. प्रामुख्याने प्लॅटफाॅर्म व पार्किंग यातून काहीअंशी कमाई करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
यातच कोपरगाव रेल्वेस्थानकाचे प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर प्रति व्यक्ती १० रुपये, तर पार्किंगचा दर १० ते २० रुपयांपर्यंत आकाराला जात आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर पोहोचविण्यासाठी जाणाऱ्या नातेवाइकांना तूर्तास तरी दिलासा मिळत आहे. विशेष म्हणजे गेली अनेक वर्ष हे सर्व दर स्थिर आहेत.
कोपरगाव रेल्वेस्थानक हे तालुक्याच्या ठिकाणी आहे. या स्थानकावरून मनमाड, तसेच दौंडच्या दिशेने दररोज ३० पेक्षा जास्त एक्स्प्रेस गाड्या धावत आहेत, तर पॅसेंजर रेल्वे बंद आहेत. या एक्स्प्रेसतून कोपरगाव स्थानकावरून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात.
परंतु, कोरोनामुळे गर्दी न करण्याचे प्रशासनाच्या सूचना असल्याने या स्थानकावर प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्याची संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म तिकीट, तसेच पार्किंग ठेकेदारांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. दरम्यान कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात सर्वच जनजीवन विस्कळीत झाले आहे.
त्याचा सर्वच क्षेत्रावर विपरित परिणाम झालेला आहे. त्याचा थेट फटका रेल्वेलादेखील बसला आहे. त्यामुळे अनेक रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर ३० ते ५० रुपये, तर पार्किंगचे दर १० ते ४० रुपयांपर्यंत आकारले जात आहेत. नाहीतर कारवाई होऊ शकते… प्रवाशांनी प्लॅटफाॅर्म तिकिट हे घेतलेच पाहिजे.
विना प्लॅटफाॅर्म तिकिट घेत स्थानकावर फिरणे गुन्हा असतो. यातून दंडात्मक कारवाई होवून नाहक मनस्ताप होवू शकतो. यासाठी नियमांचे पालन करा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.