अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:- संगमनेर तालुका पोलिसांच्या पथकाने संगमनेर ते लोणी रस्त्यावर वडगावपान शिवारात विना परवाना वाळूची चोरून वाहतूक करणारा डंपर पकडला आहे.
याप्रकरणी डंपरचालक व मालकाविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर ते लोणी रस्त्याने विना परवाना चोरून वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार तालुका पोलिसांच्या पथकाने वडगावपान शिवारात हॉटेल मल्हारसमोर बेकायदा वाळू वाहतूक करणारा डंपर (क्र. एमएच ४६ १६४९) पकडला. त्यात अंदाजे १२ हजार रुपये किंमतीची ४ ब्रास वाळू होती. या वाळूसह ६ लाख किंमतीचा डंपर असा मिळून ६ लाख १२ हजार किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
डंपर संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला घेऊन येत असताना चालक अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेला. पोलीस नाईक शिवाजी डमाळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
त्यानुसार चालक सतिष संपत रोडे (रा. येठेवाडी, ता. संगमनेर) व अज्ञात डंपर मालकाविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आण्णासाहेब दातीर अधिक तपास करीत आहेत.