अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- संगमनेर शहरातील शक्तीमान टॉवर, बाजारपेठ, अकोले नाका, जयजवान चौक, कतार गल्ली या ठिकाणी ऑनलाईन मटका सुरु होता. शहर पोलिसांनी अचानक चारही ठिकाणी छापा टाकला.
या छाप्यात त्यांना कॉम्प्युटर व इतर मुद्देमाल निदर्शनास आला. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करुन चौघाजणांना ताब्यात घेतले आहे. शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून एकजण मटका व्यवसाय चालवत आहे.
संपूर्ण नियंत्रण त्याच्याकडेच असून या मटका व्यवसायातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. तसेच राहाता येथील एका बड्या व्यापार्याने संगमनेर शहरात चार ठिकाणी ऑनलाईन मटका सुरु केला आहे.
शहरातीलच एकाकडे या चार ठिकाणांची जबाबदारी सोपवली आहे. पोलिसांनी या ऑनलाईन मटक्यावर कारवाई करु नये यासाठी शहरातील मटकाकिंगने मध्यस्थी केली आहे.
या बदल्यात अधिकार्यांना दीड लाख रुपये दिले असल्याचे हा मटकाकिंग सांगत आहे. शहरात ऑनलाईन मटका जोमात सुरु असतानाच पोलिसांनी चार ठिकाणी छापे टाकून कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले आहे.
ऑनलाईन मटक्यावरील कारवाईमुळे शहरातील अवैध व्यवसायिकांमध्ये वादविवाद झाल्याने काही वेळ तणावाचे वातावरण तयार झाले होते.