अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- अकोले तालुक्यातील देवठाण येथील शिवारात एका शेतातील शेडमध्ये जुगार खेळणाऱ्या पाच जणांना छापा टाकून पोलिसांनी अटक केली. सुमारे १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याचप्रमाणे अवैध वाळू वाहतूक, अवैध दारू विक्रीप्रकरणीही कारवाई करण्यात आली.
याबाबत अकोले पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अकोले पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
तालुक्यातील देवठाण शिवारातील आरोपी राजू वसंत बोडखे याच्या शेतातील शेडमध्ये पैसे लावून तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळताना व खेळविताना मिळून आल्याने आरोपी राजू बोडखे, मच्छिंद्र लक्ष्मण साळुंखे (रा. नवलेवाडी), गणेश नामदेव बोडखे (रा. देवठाण),
सोमनाथ बरकू उघडे (रा. विरगाव), अनुप केदारनाथ नापडे (रा. संगमनेर) यांच्यावर जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे १५ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
यामध्ये रोख रक्कम, जुगराचे साहित्य, पाच मोटार सायकल, एक चारचाकी गाडी यांचा समावेश आहे. दुसऱ्या ठिकाणी अवैध वाळू वाहतुक करताना एका टेम्पोवर कारवाई करण्यात आली.
यात आरोपी शुभम संजय चव्हाण (रा. कारखाना रोड, अकोले) याच्यावर भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन सुमारे २ लाख ५ हजारांचा मुद्देमाल अकोले पोलिसांनी जप्त केला आहे.
आरोपीस अटक करण्यात आली आहे. तिसऱ्या ठिकारी अकोले शहरातील शाहूनगर येथे आरोपी काशिनाथ भीमराव शिंदे (रा. शाहूनगर) व सुनिल अर्जुन मेंगाळ (रा. ठाणगाव, ता. सिन्नर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३४६० रुपयांची दारु जप्त करुन दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.