अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान सण शांततेत व गर्दी न करता साजरा होण्याच्या पार्श्वभूमीवर झेंडीगेट येथे शहरातील मुस्लिम समाजातील जबाबदार व्यक्ती, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत शहराचे विभागीय पोलीस उपअधिक्षक विशाल ढुमे यांनी बैठक घेतली.
तर रमजान ईद घरातच साजरी करण्याचे त्यांनी आवाहन केले. पोलीस उपअधिक्षक ढुमे यांनी मुस्लिम समाजातील प्रमुख व्यक्तींशी संवाद साधून हा सण गर्दी टाळून कसा साजरा करता येईल? या संदर्भात चर्चा केली.
यावेळी नगरसेवक समद खान, आसिफ सुलतान, मन्सूर शेख, उबेद शेख, साहेबान जहागीरदार, आमिर सय्यद, मोहंमद इराणी, हाजी फकिर मोहंमद, फारुक रंगरेज, अखलाक शेख, जुनेद शेख, अदनान शेख, वहाब सय्यद, मतीन खान,
आसिफ शेख, जुनेद सिमला, अल्ताफ कुरेशी, जाकिर कुरेशी, रहेमान शेख, रईस शेख आदी उपस्थित होते. उबेद शेख व मन्सूर शेख यांनी मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनास पुर्णत: सहकार्य राहणार असल्याचे आश्वासन दिले.
तर उपस्थितांनी ईदगाह मैदान व मस्जिद मध्ये सामुदायिक पध्दतीने ईदची नमाज पठण केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. स्वत: व कुटुंबीयांची जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या संकटकाळात पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक करुन,
विशाल ढुमे यांना पवित्र कुराण ग्रंथाची भेट देऊन प्रातिनिधिक स्वरुपात पोलीस दलाचा सन्मान करण्यात आला. पोलीस उपअधिक्षक ढुमे म्हणाले की, रमजान हा सण संयम व अल्लाहची भक्ती शिकवतो. कोरोनाच्या काळात मुस्लिम समाजाने देखील संयमाने हा सण गर्दी न करता साध्या पध्दतीने घरीच साजरा करावा.
गर्दी झाल्यास कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भिती आहे. परिस्थिती गंभीर असून, आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आहे. इतर मुस्लिम देशात सुध्दा गर्दी न करता रमजानमध्ये इबादत सुरु आहे. कोरोना हा कायमचा राहणार नसून आपले व कुटुंबीयांचे जीव महत्त्वाचे आहे.
एकमेकास ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर न पडता मोबाईलवरच शुभेच्छा द्याव्या. पोलीस लाठी न उगारता प्रेमाचा संदेश देऊन सहकार्याची अपेक्षा करत असल्याचे त्यांनी सांगितले.