अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव परिसरात गोदावरी नदीपात्रात वाळूतस्करी सुरु असताना पोलीस व महसूल पथकाने छापा टाकून बाळूच्या गाड्या पकडल्या.
मात्र यातील दोन गाड्या अज्ञातांनी पेटवून दिल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नायगाव येथे रात्री गोदावरी नदीपात्रात वाळूतस्करी सुरू असल्याची गुप्त माहिती डीवायएसपी संदीप मिटके व तहसीलदार प्रशांत पाटील यांना मिळाली.
तातडीने पोलीस व महसूल प्रशासन तसेच स्वतः डीवायएसपी व तहसीलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. महसूल व पोलीस फोर्सचे कर्मचारी यांनी नदीपात्रात तीन वाळूच्या गाड्या पकडल्या.
एक गाडी नदीपात्रातून बाहेर काढून ती पोलीस स्टेशनला आणण्याचे काम सुरू असताना,दरम्यानच्या काळात मागे अंधारात दोन वाळूच्या ट्रक कोणीतरी अज्ञात इसमांनी पेटवून दिल्या.
याठिकाणी डीवायएसपी संदीप मिटके व तहसीलदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळलेल्या वाळू गाड्या व पकडलेली एक वाळू गाडी अशा तीन गाड्या जप्त करून श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.
दरम्यान या दोन गाड्या अंधारात जमावाने पेटविल्या? कि वाळू तस्करीमधील स्पर्धेतून त्या पेटविण्यात आल्या? या जळालेल्या डंपरचा मालक कोण आहे? नेमक्या कोणत्या तस्करांच्या या गाड्या आहेत? याचा तपास सुरू आहे.
वाढती वाळू तस्करी व वाळू तस्करांच्या वाढत्या दहशतीमुळे नायगाव भागात तातडीने पोलीस चौकी सुरू करावी, अशी मागणी नायगाव ग्रामस्थांनी केली आहे.