अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- अवैध सावकारकीच्या वसुलीसाठी शेतकऱ्याचा ट्रॅक्टर घेऊन गेलेल्या एका सावकाराला अटक करण्यात आली आहे. दरम्यान हि घटना कर्जत तालुक्यात घडली आहे.
महेंद्र नेटके असे अटक करण्यात आलेल्या सावकाराचे नाव आहे. महाराष्ट्र सावकारकी कायद्यानुसार नेटकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, एके दिवशी आरोपी महेंद्र ऊर्फ गणेश नाना नेटके व इतर दोघे (सर्व रा. नेटकेवाडी, ता. कर्जत) यांनी फिर्यादी व त्याचा भाऊ यांच्या घरात येऊन फिर्यादीचे नातेवाईक यांना व्याजाने घेतलेले
५ लाख ५० हजार व त्यावरील व्याजासह १० लाख रुपये द्या, असे म्हणून लाथा-बुक्क्याने मारहाण केली. फिर्यादीचा ट्रॅक्टर हा बळजबरीने नेला.
जर तुम्हाला पैसे द्यायचे नसले तर तुमची जमीन माझ्या नावावर करून दे, नाहीतर तुमच्या घरातील एकालाही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी सावकाराने फिर्यादीस दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस अंमलदार सलीम शेख, उद्धव दिंडे, अमित बर्डे, मनोज लातूरकर यांनी सावकारास अटक केली.
तसेच कोणत्याही ग्रामस्थांना सावकाराकडून वसुलीसाठी काही त्रास होत असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.