नगर जिल्ह्यात वाहनांना लुटणाऱ्या नाशिकच्या टोळीला पोलिसांकडून अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात लुटमारी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. मात्र याला आवर घालण्यासाठी खाकी सक्षमपणे उभी आहे.

नुकतेच इमामपूर घाटात वाहन चालकाला लुटणार्‍या नाशिकच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातून अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अन्सार हसन पठाण (रा. माणिक दौंडी ता. पाथर्डी) व त्यांचा मित्र अमोल काळे यांनी त्यांच्याकडील टेम्पोमध्ये औरंगाबाद येथून विदेशी दारूचे बॉक्स कोल्हापूरला घेऊन चालले होते. 28 मे रोजी रात्री पठाण व काळे इमामपूरच्या घाटातून टेम्पो घेऊन जात असताना

चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी त्यांना आडविले. छर्‍याचे बंदुकीचा धाक दाखवून दारूसह टेम्पो पळवून नेला होता. त्यांनी लगेच जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून घटनेची माहिती दिली.

टेम्पोला असलेल्या जीपीएस प्रणालीच्या मदतीने एमआयडीसी, राहुरी पोलिसांनी तो टेम्पो चिंचोली फाटा येथे पकडला होता. मात्र, लुटमार करणारे आरोपी पसार झाले होते.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदरच्या गुन्ह्यातील फरार आरोपी स्वप्नील ऊर्फ भुषण सुनील गोसावी (वय 21), संतोष ऊर्फ बापू पंडीत खरात (वय 21 दोघे रा. नामपूर ता. सटाणा जि. नाशिक),

कुलदिप ऊर्फ गणेश मनोहर कापसे (वय 38 रा. नाशिक), भारत सिताराम सुतार (वय 36 रा. ओझर ता. निफाड जि. नाशिक) यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान एलसीबीच्या पथकाने आरोपींचा नाशिक जिल्ह्यात शोध घेऊन त्यांना अटक केली. तपासकामी आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24