अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- अकोले तालुक्यातील रेशन घोटाळ्या प्रकरणी पोलिसांनी प्रमुख आरोपींविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. याप्रकरणी शहरातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असणार्या संदीप भानुदास शेणकरसह कोतूळ येथील शिवाजी मारुती मुठे यास पोलिसांनी अटक केली आहे.
अकोले तालुक्यात अनेकदा अवैध रेशनिंगचा धान्यसाठा पकडला गेल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष होता. याबाबत अधिक माहिती अशी कि,
अकोले तालुक्यात चार महिन्यांपूर्वी राजूर पोलीस स्टेशन समोर अवैद्य रेशन भरलेल्या तीन गाड्या पकडून गुन्हा दाखल करण्याची व त्यानंतर ऐन दिवाळीत नवलेवाडी येथे रेशनिंगचा तांदूळ पकडल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी अकोले पोलिसांत पुरवठा अधिकारी सतीशकुमार कृष्ण धारकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवून पुढील तपास करण्यात आला.
एका घरामध्ये व आयशर टेम्पोत रेशनिंगचे 182 कट्टे सह वाहन असा 9 लाख 80 हजार रुपयाचा मुद्दे माल जप्त करून दत्ता सुदाम चोथवे व खंडु काशिनाथ भारमल याच्या विरोधात अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता..
तर अन्य आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर अकोले पोलिसांनी उशिरा का होईना या प्रकरणी शिवाजी मारुती मुठे (वय-40,रा कोतूळ,ता अकोले) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या संदीप भानुदास शेनकर (वय 39,रा कारखाना रोड,अकोले) यांना अटक केली आहे.