दरोडा टाकण्यापूर्वीच ‘त्या’ टोळीला पोलिसांनी केले जेरबंद..!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दुचाकीवर जाणार्‍या टोळीला नगर – पाथर्डी महामार्गावरील  बाराबाभळी गावच्या शिवारात भिंगार कॅम्प पोलिसांनी जेरबंद केले.

या टोळीतील तिघांना सिनेस्टाईलने पकडले असून दोघेजण अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहेत. केशव उर्फ काज्या ताज्या भोसले , मयुर उर्फ हरीष युवराज काळे, वैभव नखर्‍या चव्हाण अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, भिंगार कॅम्प पोलिसांचे पथक खाजगी व सरकारी वाहनाने फरार आरोपींचा शोध घेत होते यावेळी स.पो.नि. शिशिरकुमार देशमुख यांना काही जण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती मिळाली.

त्यानुसार भिंगार कॅम्प पोलिसांनी नगर-पाथर्डी रोडवरील प्रकाश हॉटेल समोरील शेतात सापळा लावला, त्यानंतर काही वेळातच तीन मोटारसायकलवरून ५ इसम बाराबाभळीकडे येताना दिसले.

त्यावेळी पथकातील सर्वांनी रस्त्यावर येऊन त्यांना मोटारसायकली थांबविण्याचा इशारा केला. पुढे असलेल्या दोन मोटारसायकली थांबवून सदर मोटारसायकलीवरील ३ इसमांना ताब्यात घेतले.

या सर्वांना ताब्यात घेत असताना त्यांचे पाठीमागून येत असणार्‍या आणखी एक मोटारसायकल वरील दोघांनी पोलिसांना हुलकावणी देत पाथर्डी रोडच्या दिशेने भरधाव वेगात निघून गेले. त्यानंतर पकडलेल्या इसमांकडे पळून गेलेल्या इसमांबाबत चौकशी केली असता  ताज्या पाच्या भोसले, रुपेश ताज्या भोसले असे असल्याचे सांगितले.

त्यानंतर पकडलेल्या इसमांची अंगडझडती घेतली असता त्यांच्याकडे एक सत्तूर, दोन लाकडी दांडके, दोरी, मिरची पावडर, व दोन मोटारसायकल असा दरोड्याच्या तयारीतील मुद्देमाल एकूण ६० हजार ३० रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24