अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- शहरातील चांदणी चौकात 10 जानेवारी रोजी एका पोलीस कर्मचार्याला आठ जणांनी मारहाण केली होती. त्यातील चौघांना पकडण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे.
श्याम बाबासाहेब जाधव (वय 20), रोहन राजु जाधव (वय 20), दीपक कचरू माळी (वय 20) व विकास लक्ष्मण भालेराव (वय 21 सर्व रा. निबोंडी ता. नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
हे सर्व आरोपी दौंड, श्रीगोंदा, निबोंडी (ता. नगर) परिसरातून पकडले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस मुख्यालयात नेमणूकीस असलेले
पोलीस कर्मचारी अदिनाथ दिनकर शिरसाठ (रा. आष्टी जि. बीड) हे 10 जानेवारी 2022 रोजी अहमदनगर शहरातील चांदणी चौकातील महालक्ष्मी मंदिराच्या समोरून त्यांच्या दुचाकीवर जात असताना
दुचाकीची धडक लागल्याच्या कारणातून त्यांना आठ जणांनी मारहाण केली होती. शिरसाठ यांच्याकडील 20 हजार रूपयांची रक्कम व 10 हजार रूपये किंमतीचा मोबाईल काढून घेतला होता.
याप्रकरणी शिरसाठ यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे श्याम बाबासाहेब जाधव, रोहन राजु जाधव (दोघे रा. निंबोडी ता. नगर) व अनोळखी सहा जणांविरूध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाले होते. कोतवाली पोलिसांनी त्यांचा निबोंडसह इतरत्र शोध घेतला; पण ते मिळून आले नव्हते.
कोतवाली पोलिसांना आरोपीचा सुगावा श्रीगोंदा, दौंड परिसरात लागला होता. तेथे जात पथकाने तिघांना अटक केली. एकाला निबोंडीतून ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले.