अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- अवैध वाळूउपसा करणाऱ्यांवर कर्जत पोलिसांनी मोठी कारवाई केली. यात 24 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला, तर दोघांना अटक करण्यात आली.
तसेच या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कर्जत पोलिसांनी हि कारवाई तालुक्यातील गणेशवाडी शिवारातील भीमा नदीपात्रात केली. याप्रकरणातील आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजार केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गणेशवाडी येथे भीमा नदीपात्रात काही व्यक्ती यांत्रिक बोटीच्या साह्याने अवैध वाळूउपसा करीत असल्याची माहिती कर्जतचे पोलिस निरीक्षक यादव यांना मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक भगवान शिरसाठ यांच्यासह पथकाने तेथे कारवाई केली.
यावेळी पंधरा लाख रुपये किमतीच्या तीन यांत्रिक फायबर बोटी व नऊ लाख रुपये किमतीच्या तीन सक्शन बोटी, असा एकूण चोवीस लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. पोलिसानी याप्रकरणी लहू बबलू शेख (रा. पिअरपूर, झारखंड), शौकत बच्चू शेख (रा. पळसगच्ची, झारखंड) या दोघांना ताब्यात घेतले.
आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी भरत बलभीम अमनर, शरद शेंडगे (दोघे रा. वाटलूज, ता. दौंड, जि पुणे), दत्तात्रय विक्रम खताळ, अंकुश ठोंबरे (दोघे रा. गणेशवाडी, ता. कर्जत) यांची नावे सांगितली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.