अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- श्रीगोंदा तालुक्यातील घोड नदीपत्रातून यांत्रिक बोटींच्या साहाय्याने मोठ्या अवैधपणे वाळूचा उपसा केला जातो. मात्र आता पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून त्यांनी या तस्करांना चांगलाच दणका दिला आहे.
नुकताच पोलिसांनी अवैध वाळू उपसा करण्यांची यांत्रिक बोटीसह ट्रक,एक हायवा व वाळू असा एकूण २० लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी ४ जणांवर बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी गावच्या शिवारातील घोड नदीपात्रातून काहीजण यांत्रिक बोटीच्या सहाय्याने वाळूउपसा व वाहतूक करत असल्याची माहिती बेलवंडी पोलिांना मिळाली होती.
त्या आधारे पोलिसांनी हिंगणी गावच्या शिवारात छापा टाकला असता येथे काहीजण यांत्रिक बोटीव्दारे वाळूउपसा व वाहतूक करताना आढळून आले.
पोलिसांनी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करत पांढऱ्या रंगाचा हायवा (नं एमएच १२ क्युजी २८०५),एक लाल रंगाचा ट्रक (एमएच १२ एमव्ही ४४४१) व एक यांत्रिक बोट, तिन ब्रास वाळू असा एकूण २० लाख ६० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
तर अवैध वाळूचे उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी नाना नेताजी कदम (वय २९ रा.सांगवी, ता.तुळजापूर, जिल्हा.उस्मानाबाद हल्ली रा.काल्हेवाडी राजापूर ता.श्रीगोंदा), विश्वजीत कदम (रा.कोल्हेवाडी राजापूर ता.श्रीगांेदा),
आप्पा रामदास पांढरे (रा.मोटेवाडी, गव्हाणवाडी ता.श्रीगोंदा), यांत्रिक बोटचालक, मालक नाव पत्ता माहित नाही यांच्यावर पोकॉ.संपत गुंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक तपास पोहेकॉ.कोळपे हे करत आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे मात्र या भागातील अवैध वाळूउपसा करणाऱ्यात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.