अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-तब्बल अडीच कोटी रुपयांचा दिल्ली महापालिकेच्या नावाने असलेला बनावट चेक बँकेत वटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे.
त्यांच्याकडून दोन कार, बनावट शिक्के, चेकबुक, मोबाइल असा २० लाख ९५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दिल्ली म्युनिसिपल कौन्सिलच्या नावे अडीच कोटी रुपयांचा एक चेक विपूल वक्कानी, यशवंत देसाई, नरेश बालकोंडेकर हे घेऊन सावेडीतील स्टेट बँकेच्या शाखेत आले. त्यांनी बँकेत चेक वटविण्यासाठी दिला.
या चेकबाबत शाखेतील मॅनेजरला शंका आली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांना संपर्क करून माहिती दिली. निरीक्षक घुगे यांनी पथकासह तात्काळ बँकेत जाऊन खात्री केली असता
त्यांना सदरचा चेक बनावट असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी सात जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक रविकिरण सोनटक्के यांनी फिर्याद दिली आहे.
विपूल नरेश वक्कानी (वय ४०), यशवंत दत्तात्रय देसाई (वय ४९), नरेश रामचंद्र बालकोंडेकर (वय ३३), राहुल ज्ञानोबा गुळवे (वय ४६), संदीप भगत, तुषार आत्माराम कुंभारे (सर्व रा. पुणे) व विजेंद्र दक्ष (रा. दिल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत.
विपूल वक्कानी, यशवंत देसाई, नरेश बालकोंडेकर, राहुल गुळवे यांना पोलिसांनी अटक केली आहे.