अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-मागील काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकुळ घातला होता. यात अनेक भागातील बंद घराचे दरवाजे, खिडकी तोडून घरे फोडल्याच्या घटना घडल्या होत्या.
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडी करणारा अट्टल चोरटा भगवान ईश्वर भोसले वय २१रा.बेलगाव ता.कर्जत.व या चोरट्याकडून चोरीचे सोने विकत घेणारा रामा अभिमन्यू इंगळे (वय ३३ रा.पाडळी ता.शिरूर कासार जी.बीड) या दोघांना जेरबंद केले असून,
त्यांच्याकडून तब्बल १४ लाख ३२ हजारांचे सोन्याचे दागिने, मोबाईल,व वाहने असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, रिमा वालचंद धाडगे (रा. वडगाव तांदळी ता. नगर) यांचे घर फोडून चोरट्यांनी ७२ हजारांचा ऐवज लंपास केला होता.
धाडगे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ग्रामीण भागात झालेल्या घरफोड्यांचा तपास सुरु होता. यातच धाडगे यांची घरफोडी भगवान भोसले व त्याच्या साथीदारांनी मिळून केली,
भगवान भोसले व त्याचा भाऊ संदीप भोसले हे दोघे दुचाकीवरून चोरीचे सोने विक्रीसाठी शिरूर कासार येथे येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली.
दरम्यान माहिती मिळताच पोलीस पथकाने कडा ते शिरूर रस्त्यावर सापळा लावून भगवान भोसलेला अटक केली. त्याच्या सोबत असलेला भाऊ संदीप भोसले पसार झाला.
आरोपीने वडगाव तांदळीसह इतर 6 गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. चोरी केलेले सोने राम इंगळे या सोनाराकडे विक्री करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
सोने विकत घेणारा रामा अभिमन्यू इंगळे (वय ३३ वर्षे रा.पाडळी ता.शिरूर कासार जि.बीड) याला पोलिसांनी ताब्यात घेवून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता,
त्याने आपण सोने विकत घेतल्याचे कबुल केले. पोलिसांनी सर्व १४ लाख ३२ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, या दोघांना ताब्यात घेतले आहे.