अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- नगर तालुक्यातील हिवरेझरे गावामध्ये तालुका पोलिसांनी एका घरावर टाकलेल्या छाप्यात एका गोणीमध्ये 30 हजार रूपये किंमतीचा गांजा मिळून आला.
या प्रकरणी पोलीस नाईक भानुदास सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामचंद्र तुकाराम उदमले (रा. हिवरेझरे ता. नगर) याच्याविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, उदमले याने गांजा विक्री करण्यासाठी घरामध्ये साठवून ठेवला असल्याची माहिती नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सानप यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार निरीक्षक सानप यांनी एक पथक तयार केले. पोलीस पथकाने उदमले याच्या घरी छापा टाकला.
यावेळी घरामधील एका गोणीमध्ये गांजा मिळून आला. पोलिसांनी सर्व गांजा जप्त केला आहे. उदमले विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राऊत करीत आहे.