अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- शेवगाव येथील नेवासा रोडवर हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर नगर पोलीस व पुणे येथील फ्रिडम फर्म या सेवाभावी संस्थेने संयुक्त कारवाई केली.

या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. तर दोन मुलींची सुटका केली आहे. काल रात्री हॉटेल सागर येथे ही कारवाई केली.

सचिन रूपचंद मुसावत (रा. शेवगाव), संदीप माणिक शेळके (रा. रामनगर, शेवगाव) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. फ्रिडम फर्मचे संदेश जोगेराव यांनी फिर्याद दिली आहे.

शेवगावमधील नेवासा रोडवर सागर हॉटेलवर लहान मुली व महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती फ्रिडम फर्म या सेवाभावी संस्थेला मिळाली होती.

त्यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन सदरची कारवाई करण्याबाबत सांगितले. अधीक्षक पाटील यांनी याबाबत पोलीस उपअधीक्षक (गृह) बाजीराव पोवार यांना सूचना केल्या.

त्यानुसार शेवगावचे उपअधीक्षक सुदर्शन मुंढे हे देखील कर्मचार्‍यांसह नगर पथकासोबत हजर झाले. या पथकाने हॉटेलमध्ये छापा टाकून दोन मुलींची सुटका केली.

अहमदनगर लाईव्ह 24