अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच विनाकारण फिरणार्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.
यातच जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांमध्ये पोलीस दलाने कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई केली.
या कारवाईअंतर्गत पोलिसांनी 1 लाख 48 हजार 860 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली असून आतापर्यंत चार कोटी 34 लाख सहाशे रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
याबाबत पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले की, जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यापासून पोलीस विभागाने धडक कारवाई मोहीम हाती घेतलेली होती. कोरोना नियमांचे उल्लंघन करेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्याचे निर्देश होते. त्यानुसार जिल्हाभरात ही कारवाई मोहीम हाती घेण्यात आली होती.
मे महिन्यामध्ये दोन कोटी सात लाख 55 हजार रुपये दंड पोलिसांनी वसूल केलेला आहे. तर मे महिन्यामध्ये 65 हजार 696 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली असून त्याची संख्या सहा हजार 472 आहे.
सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी 2852, संचार बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 3211 तर कोरोना काळामध्ये बेकायदेशीरपणे दुकाने चालू ठेवली व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 578 दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली असल्याचे अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले.