अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत होते.
मात्र ऐकतील ते नगरकर कुठले… बाहेर धोका असतानाही नगरकरांनी नियमांचे उल्लंघन केले आणि पोलिसांनी त्यांवर कारवाई केली.
नगर शहरात २२ मार्च ते २७ मे दरम्यान कोरोना संदर्भात लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ३३ हजार ५६ जणांवर कारवाई करत तब्बल १ कोटी १ लाख ५३ हजार २९५ रुपयांचा दंड वसूल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाने मार्चपासून कडक निर्बंध लागू केले.
प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही लोक नियमांचे उल्लंघन करत असल्याने पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली.
शहरात दररोज चौकाचौकात नाकाबंदी करून ही कारवाई केली जात आहे. सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणे, विनाकारण बाहेर फिरणे,
मोटरसायकलवर डबलसीट जाणे, विनामास्क, मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन, दुकाने उघडी ठेवणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली.