अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी पत्रकार बाळ बोठे हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे.
दरम्यान जरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींविरूध्द शुक्रवारी पोलिसांनी पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
पोलिसांनी घोषित केलेला मुख्य सुत्रधार बाळ बोठे अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. म्हणून आज पोलिसांनी त्याला फरार घोषित करावे यासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला असून, त्याची सुनावणी लवकरच होणार आहे.
दरम्यान जरे यांची हत्या होऊन तीन महिने उलटतील मात्र अद्यापही जरे यांच्या हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. बोठे हा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते.
पोलिसांना बोठे शोधूनही अद्याप सापडलेला नाही. जिल्हा व सत्र न्यायालयाने तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेला आहे.
पोलिसांनी बोठेच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट जारी केलेले आहे. आरोपी बोठे याचा तपास लागलेला नाही. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तात्काळ पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार आज तपासी अधिकारी अजित पाटील यांनी न्यायालयामध्ये आरोपी मोठे याला फरार घोषित करावे यासाठी अर्ज आज पारनेर येथील न्यायालयामध्ये दाखल केला आहे.
या अर्जावर लवकरच सुनावणी होणार आहे. दरम्यान याप्रकरणी रेखा जरे यांचा मुलगा रूनाल हा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसणार आहे.